Er Rational musings #276
पन्नाशीचा मोरया...
एक महत्वाचा टप्पा.
तीशी, पस्तिशी, चाळीशी, करता करता पन्नाशी आलेली असते. आत्ता पर्यंत काका, मामा, अंकल, साहेब, सर इ (वेळ, परिस्थिति नुसार मारलेली हाक) संबोधनं अंगवळणी पडलेली असतात. डोक्याचा छानसा अर्धचंद्र झालेला असतो. उरल्या सुरल्या दंतपंक्ती सुध्दा त्रास देतात. चाळीशी कधीचीच लागलीये. हात पाय, शरीर थकायला लागतय. आवडी निवडी, चवी, मतं, पक्की(च) बनलेली असतात. इरिटेशन वाढतय.
सगळंच कसं निगेटिव्ह वाटतय ना? वय वाढणारच, निसर्ग नियम.
पण पण पण...
एक चांगली (!) गोची आहे.
आत्तापर्यंत करण्याच्या राहून गेलेल्या (कारणं एक ना अनेक) गोष्टींची नुसती हूरहूर लागत नाहीये, तर नव उत्साहाने त्या साध्य करण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची, नवीन काहीतरी करण्याची उर्मी मात्र उफाळून येते. आणि का नाही? मूलं बऱ्या पैकी मार्गी लागलीयेत, थोडासा वेळ आहे, थोडासा पैसा आहे, थोडीशी (खरीखूरी) अक्कल वाढलीये, चार ओळखी झाल्यात. ना जीवघेणी ईर्षा ना दमछाक करणारी स्पर्धा. असलीच तर स्वत:शीच! मानसिक समाधान, निर्भेळ आनंद व अँटलीस्ट मी करून बघीतलं, मला बऱ्यापैकी जमलं, हे खरं समाधान.
इच्छा तिथे मार्ग. हँप्पीवाली पन्नाशी!!
आणि काय पाहीजे...
---
मिलिंद काळे, 19th December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment