Er Rational musings #623
'आज बिस्कीटे खाऊ नका हं', आमच्या अहोंचा प्रेमळ सूचनावजा इशारा. (सिगारेटच्या पाकीटावर असतो ना, तसाच, वैधानिक इशारा: 'सिगारेट स्मोकींग इज इंज्यूरियस टू हेल्थ'; अहोंचा इशारा धुडकावणं म्हणजे सुध्दा इंज्यूरियस टू हेल्थ!!) कारण आज मोठ्ठी एकादशी.
जाँईंट फँमिलीचे काही महत्वाचे फायदे असतात. सगळ्ळ सुरवातीला मुकाट्याने व नंतर आपसूक आवडीने आपण खायला शिकतो, खायला लागतो. त्यातलाच आजचा हा, आमच्यासाठी सोनियाचा दिवस.
एकादशी वगैरे असे मोठ्या उपासाचे दिवस म्हणजे आमच्यासाठी पर्वणी. लहानपणी, अगदी आत्ताआत्तापर्यंत, पानातले पदार्थ मोजण्याचा हा आजचा दिवस. एकदातर मी चोवीसेक छोटे-मोठे पदार्थ मोजले होते ताटातले. आणि बरोब्बर आदल्या दिवशी आज्जी वा आई आठवण करून द्यायच्या पण, उद्या उपास (काहींचा उपवास!) आहे हं.
डावीकडची सुठ गोळी. व मोरावळा. याने खायला सुरूवात करायची सल्लावजा ताकीद असे. एकादशीचा फराळ करताना! (हे जड अन्न पचायला सोप्पे जावे म्हणून.) (आणि, नाहीका, आपल्याला शिकवलय, की डावीकडची खीर पहिले खावी, सुदीसणांच्या पक्वांन्नांच्या भोजनाच्या वेळी - सिमिलरली!) बरं, आज 'जेवायला' चला, असे न म्हणण्याचीही सूचना कम ताकीद होती; 'फराळाला' चला, असेच आज म्हणायचं, सगळ्यांना बोलावताना.
साबूदाण्याची खिचडी, दाण्याचा लाडू, वरीचा तांदूळाचा भात, दाण्याची आमटी, रताळ्याचा कीस, केळी, बटाट्याची भाजी, बटाट्याचा चिवडा, बटाट्याचे पापड, साबुदाण्याच्या पापड्या, खजूर, राजगिऱ्याचा लाडू, चिक्की, बटाट्याचे वेफर्स, काकडीची कोशिंबीर, साबूदाण्याचे थालिपीठ, दाण्याची ओली चटणी...ताकातला साबूदाणा, साबूदाण्याची खीर...अबब...हे सर्व थोड्या बहुत प्रमाणात आज जेवणात, साँरी, फराळाला असायचे - असतात. काळ्यांकडची जूनी प्रथा!
एकादशी दुप्पट खाशी म्हणतात ते काही उगाच नाही!
माझं कस्टमायझेशन अर्थातच. घराबाहेर पडलं, की, भक्ष अभक्ष जे जे पुढ्यात येईल ते आपले. स्वाहा; मम; गोविंद! कामानिमित्त, नोकरीदाखल, बाहेर पडलं की आपले आपण मोकळे. हमखास. मूद्दामहून, आवर्जून.
शुभ दिनी आपल्याला जे मनापासून आवडतं ते केलं/खाल्लं की प्रचंड पूण्य (!) मिळतं, हा माझा सिधांन्तच आहे. ट्राईड अँन्ड टेस्टेड फाँर्म्युला.
आणि सामिष फराळ (!) मला मनापासून आवडतो...
---
Milinnd Kale, 15th July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment