Tuesday, August 23, 2016

Er Rational musings #682

Er Rational musings #682



मिहीर च्या पाठी बाईक वर बसायला भिती वाटायला लागलीये. तशाही, काय या हल्लीच्या मोटार सायकली, साँरी, बाईक्स! सीट म्हणजे एकतर पत्र्याचा डबा असतो, वर पाsssतळ सीटसदृश लेयर. बरं, ह्हे उंच पाठून. म्हणजे कसबसं चढून बसलं, की पार्श्वभाग उर्फ ढूंगण ह्हे वरती. ह्या पोरीबीरी आर्राम्मात मज्जेत बसलेल्या असतात, बाईकस्वाराच्या पाठीवर घसरून आदळून चिकटून. स्साला आमच्यासारख्यांचे काय? बर, हात पकडायला पण दांडीबिंडी काही नाही. कसली ती अडचण, व पाठी पडण्याची भिती कायम मनात, तोल बिल जाऊन.

आमच्या हिरो होंडा सीडी 100 बर्या होत्या. वा बजाज सूपर. वा येझ्दी. वा अँपी १००.  वा राजदूत! पण आता जाणवतय, माझे बाबा माझ्या पाठी अस्सेच अवघडून बसायचे.

आता मी तसा बसतो.



माझा "बाबा" झालाय, हे नक्की!!



मिहीर च्या बाजूला चारचाकीत बसायला भिती वाटायला लागलीये. म्हणजे रिफ्लेक्स अँक्शननी पाय वारंवार (नसलेल्या) ब्रेकवर दाबला जातोय, अधनंमधनं. (ट्रेनिंग वेहिकलला ड्रायव्हर च्या बाजूला बसलेल्या कडे पण ब्रेक असतो ना, तस्सा!!) खरतर, असे होण्याचे काहीच कारण नाही.

मिहीर उत्तम प्रकारे, व सेफ, व कंन्ट्रोल मध्ये दूचाकी व चारचाकी चालवतो. व ते ही प्रचंड आत्मिक आवडीने. शिवाय, साक्षात अस्मादीकांनी ओके परफेक्ट असे सर्टीफाय केलेले आहे. म्हणजे तसा प्रश्न नाहीये.

पण होतय काय, उगाचच वाटतं की अर्र सांभाळून, अर्र ब्रेक मार, अर्र टेकेल बिकेल; वास्तविक प्रत्येकाच टेक्नीक, कंन्ट्रोल, जजमेंट, निराळं असतं.

तरीही.



माझा "बाबा" झालाय, हे नक्की!!



वय वाढलय लेका घाबरटा...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२३ आँगस्ट २०१६

No comments:

Post a Comment