Er Rational musings #678
महाराष्ट्र पोलिस सायबर सेलचे महासंचालक श्री ब्रिजेश सिंह साहेबांची काल एका वाहिनीवर मुलाखत बघीतली. अत्यंत उद्बोधक.
चर्चेदरम्यान एका प्रश्नाचा वारंवार उल्लेख होत होता. तो म्हणजे आपल्या सर्वांच्या हाताहातातला, हा (ओव्हर)स्मार्ट फोन व त्या अनुषंगानं होत असलेली निरनिराळ्या अँपस् ची बौछार. त्यातनं धोक्यात आलेली सायबर सिक्यूरिटी. जणू हा सेलफोन आपल्याला डोईजड झालाय, यासम चर्चेचा रोख, व रोष.
हे खरं आहे, की, ही बहुतेक अँपस् 'फ्री' असतात. अतिशय उपयोगी. व, कित्तीतरी प्रकारची अँपस् विकसित झालीयेत.
पूण्यातल्या एका पब मध्ये गेलं की, एक कस्टमाईज्ड अँप देतात. त्याद्वारे आपण दारू आँर्डर करायची असते. आपल्या मोबाईल वरनं, तिथल्यातिथे असताना सुध्दा! त्यातनं लाईव्ह आँक्शन बिडींग असतं दारूच्या ब्रँन्ड साठी, मेनूमधल्या प्रत्येक प्रकारच्या पेगच्या किमतीसाठी. ज्या दारूला मागणी जास्त, अँट दँट पाँईंट आँफ टाईम, ती दारू महाग असते! रेट वरखाली होत असतात!! असो. (हे उदाहरण, ह्या अँप्स चा शिरकाव कुठल्या स्तरापर्यंत गेलाय, व त्यातली कल्पकता, दाखवण्यासाठीच फक्त).
मूळ कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे आपली व्यक्तिगत माहिती दिल्याशिवाय बहुतेक अँप्स डाऊनलोड होत नाहीत. व या (नंबर, ई-मेल, जीपीएस लोकेशन इ.) डेटाच पुढे काय होतं, काय होऊ शकतं, कोणाच्या हातात हा डेटा पोहोचू शकतो, व या डेटाद्वारे (इच्छा व गरज पडल्यास) कायकाय करता येतं, याची निव्वळ कल्पनाच छातीत धडकी भरवणारी आहे, ना?
मी तज्ञ नाही या क्षेत्रातला, जाणकारांनी प्रकाश टाकावा, ही विनंती.
परंतु, काही काळजी घेतली व काही गोष्टी केल्या, तर कसे?
1. वेगळा एक सेलफोन, व अँडिशनली एक नंबर घेऊन, व्हाँट्सअँप व अँप्स वगैरे उद्योग त्याद्वारेच करायचे. वेगळं व अँडिशनल नवीन ई-मेल अकाऊंट उघडून, त्याचेच डिटेल्स द्यायचे, कोणी (म्हणजे कुठल्या अँप ने!) विचारणा केली, की हे डिटेल्स फिल अप करायचे. हा नंबर, व हे मेल अकाऊंट, या असल्या सगळ्या सटरफटर गोष्टींसाठी वापरायचे. (इंन्क्ल्यूडिंग अँलन साँली, टायटन, इत्यादि शाँपिंगची दूकानेबिकाने - यांनाही हाच डेटा द्यायचा.)
2. आपला नेहमीचा नंबर व नेहमीचे ई-मेल अकाऊंट हे नेट बँन्कींग ला वापरायचे. व ते डिटेल्स द्यायचे नाहीत उठसुट.
या, किंवा याव्यतिरिक्त अजून काही सेफटी व सिक्युरिटी मेजर्स घेता येतील का, घ्यायची गरज आहे का, वगैरे संबंधी विस्तृत माहीती जर पोलिस सायबर सेल ने, वा एक्स्पर्टस् नी दिली, तर सगळ्यांसाठी फायदेशीर ठरेल, यांत शंका नाही. दिली तर उत्तमच.
नाहीतरी, तसेही आपण जगतोयच मुळी भगवान भरोसे...
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
२२ आँगस्ट २०१६
(www.milindkale.com)
(www.milindmkale.blogspot.in)
----------------------------------------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment