Sunday, March 6, 2016

Er Rational musings #413

Er Rational musings #413



काही वर्षांपूर्वीची गोष्ट. वेळ साधारणत: संध्याकाळी सव्वा पाच. आमचे चिरंजीव खाली खेळायला साडे चार ला गेलेले, त्यांची घरी यायची वेळ सात वगैरे. त्या दिवशी सव्वा पाचलाच बेल वाजली. दार उघडून बघतो तर काय? लाडके चिरंजीव, पाच सहा मित्र कंपू सोबत हजर. साहेबांच्या खांद्यावर एक कुत्र्याचे पिल्लू!

मी: अरे हे काय?

तो: बाबा, वाँटो खाली सापडला, त्याची आई नाहीये.

('वाँटो' हे नामकरण करून मोकळे हे वीर.)

मी: अरे ठिकाय, पण घरी कशाला आणला याला?

तो: बाबा, बाबा, याला आपल्या घरातच ठेवायचे.

मी: अरे ए, काय वेडा बिडा झालायस का? अस कस कुठलही पिल्लू पाळायचं? त्याची आई सोड, तुझी आई काय म्हणेल? तुला माहितीये ना?

त्याला समजावता समजावता नाकी नऊ हजार आले माझ्या.

शेवटी त्या पिल्लाला वरतीच दूध पाजलं. तेही काँमन लाँबी मध्ये!

जा आता, त्या वाँटोला खाली सोडून या. - माझा सल्ला.

तेव्हा कुठे ही सगळी गँग गेली, आली तश्शी.



'मला आवड आहे', 'हिला सुध्दा आवड आहे'. वगैरे डायलाँग ऐकिवात आहेत ना? तसेच, 'मुलं तर काय पाठीच लागलीयत. कुत्रा पाळूया'. 'आमच्या हिचे स्वाभाविक प्रश्न. याची शू शी कोण काढणार? तुम्ही सगळे जाल (पळाल) बाहेर, मग मलाच निस्तरावं लागणार' वगैरे!



एक ना दोन, हजारो कहाण्या, किस्से.



या पाळीवप्राणी प्रेमाबद्दल जेवढं पोलरायझेशन आहे, तसं दूसरं उदाहरण विरळाच. एका बाजूला कुत्र्याचे पराकोटीचं प्रेम, आवड, त्याच्याविषषी एक ही शब्द वाईट बोललेलं सुध्दा न चालणारे श्वानामालक तर दूसऱ्या बाजूला या प्रेमाला 'गाढवी' प्रेम म्हणून हेटाळणारे', तुच्छतेने काही काही ही बोलणारे काही जण...

(एव्हढे च जर कौतुक आहे, पैसा आहे, वेळ आहे, तयारी आहे, घरचाच माणूस होऊन जाणारे हा पाळीव प्राणी, हे सगळं मान्य आहे, तर, तर, एखादं अनाथ मुल दत्तक का नाही घेत ही श्वानप्रेमी मंडळी? एका हाडा मासांच्या गोळ्याचं आयुष्य बदलायचा विडा का नाही उचलत? का नाही रिअल बाळा ला पाळत, वाढवत, माया करत, आपलं नाव देत, त्याला स्वत:च्या पायांवर उभं करत...- असेही बोलणारे लोक्स आहेत!) (व त्यांचे सगळेच म्हणणे अप्रस्तुत वा चूकीचे वा अति शहाणपणाचे वा अव्यवहार्य आहे, असेही ठामपणे म्हणता येत नाही!!)



म्हणजे, कुत्रा पाळायचाय? Buy one get one free. एक अनाथ मुल, (मुलगा वा मुलगी), दत्तक घ्याच, असा नियमच आला तर??



असो.



इथे घरी माझ्या बायकोने अल्टीमेटमच दिलेले आहे, पर्मनंटली.



कुत्रा आत, तर, (घरात आला की) मी बाहेर; काय हवय ते ठरवा.



आता काय ठरवणार कप्पाळ...

---

मिलिंद काळे, 7th March 2016

(milindmkale.blogspot.in)

(www.milindkale.com)

Mulund, Mumbai.

No comments:

Post a Comment