Er Rational musings #362
पाँकेटमनी!
फारच जवळचा शब्द ना? आणि समानार्थी मराठी शब्द दूसरा नसावा, एवढा सोप्पा, बहुतेक. खर्चाला लागणारे पैसे, वगैरे. लांबचे वाटतात, पाँकेटमनी हा सुटसुटीत आहे की नाही?
आपल्या लहानपणापासूनच सुरूवात झाली असावी, असं वाटतं. आपलीच पिढी, तीन पाच वर्ष इकडे तिकडे, घराबाहेर पडली, अभ्यासाला. ट्यूशन क्लासेस ला, खेळांच्या जिमखान्यात, स्विमिंग पूलावर इत्यादि. व त्यानुसार खऱ्या खुऱ्या पाँकेटमनी ची संकल्पना आली असावी. तोपर्यंत कदाचित कारणोपरत्वे मुलांना पैसे दिले जात असावेत.
पाँकेटमनी म्हणजे फिक्स्ड ठरावीक रक्कम. 'इतर अवांतर' खर्चांना. रेल्वे पास, बस पास, रेल्वे बस तिकिटे, शाळा काँलेज क्लासेस च्या फीया, अशा अनेक आँफिशीयल गोष्टींव्यतिरिक्त मिळणारं आठवड्याचं किंवा मंथली मानधन! आई वडिलांकडून मुलांना दिली जाणारी ठरलेली रक्कम.
आता ह्या पाँकेटमनी मधून, काटकसर करून, सिगारेटी, दारू, सिनेमे, खादाडी, असले नकोनकोते छंद पार पाडायचे. कठीण काम. आपल्या जवळचा पाँकेटमनी वेळेपूर्वी संपला तर मित्र परिवार होताच की. कधीकधी आई, आज्जी, अण्णा, अशा सगळ्यांकडून ( पण आलटून पालटून), 'अडी अडचणीं' नुसार, लग्गा लावून, काही बाही कारणं सांगून, पैसे 'उकळायचे!'
आपल्या मुलांसाठी, हा पाँकेटमनी, व त्याचबरोबर (न) लिहीलेला जमा खर्च, हे असेच, (आपल्या वेळेसारखे) अजूनही चालू आहे. आपणही हिशेब लिहायचो नाही व हे सुध्दा लिहीत नाहीत.
त्याशिवाय, बऱ्याच (खूपश्या) गोष्टी आपणही करायचो, हे ही करतात!
"गोष्ट जन्म जन्मांतरीची", असं एक नाटक पंचवीस तीस वर्षांपूर्वी येवून गेले होते, गाजले होते. त्यातला एक डायलाँग, किती चपखल, स्पाँट आँन.
'त्या वेळी सुध्दा असच घडलं होतं'...
---
मिलिंद काळे, 5th February 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment