Er Rational musings #321
पतंग उडवण्याच्या असंख्य आठवणी आहेत.
अँक्च्यूअली पतंग 'उडवायचा' नसतो तर 'बदवायचा' असतो!
'तो' पतंग बर का, 'ती' पतंग नव्हे. जसे 'ते पेन', 'तो' पेन नव्हे; 'तो' कँच, 'ती' कँच नव्हे! असो.
पतंग, मांजा व फिरकी ही आम्हा पोरा टोरांची आयुधं. तिसऱ्या वाडीत (घरापासून तिसरी बिल्डिंग, ज्याला अर्ध प्रायव्हेट मैदान होतं, त्याला आम्ही तिसरी वाडी म्हणायचो. ह्या तिसऱ्या वाडीतल्या विहिरीत आम्हा सर्व मराठी लोक्स कडील गणपतींचे विसर्जन व्हायचे; असो, तिसऱ्या वाडीबद्दल नंतर कधीतरी).
तर ही तिसरी वाडी म्हणजे पतंग उडवायची जागा. कित्येक वेळा आम्ही बाबा पदमसिंह ग्राऊंड वा सोनार बांगला येथेही जमायचो.
पतंग विकत आणला की त्याला कणी बांधायची हे एक विशिष्ट टेक्नीक ची बाब होती. पतंगाला मांजा बांधायला, वरच्या बाजूला काडीच्या क्राँसमध्ये आवडनावड भोकं पाडायला लागायची, पण खरी गंमत खालच्या बाजूला मांजा कूठे बांधायचा ही होती. खालून अडीच, तीन, चार वगैरे बोटं सोडून भोकं पाडून मांजाला गाठी मारायच्या की झाली कणी तैयार. फिरकी सैल सोडून मांजाला दोन तीन चार वेळा विशिष्ट प्रकारे झटके द्यायचे. त्याचवेळी पतंग गिरक्या घेत उंच उडवायचा. मध्येच सेंटर आँफ ग्रँव्हिटीने सरळ झाला की आणखी आणखीनच झटके देत देत ऊंचच ऊंच बदवायचा. दूसऱ्या पतंगाच्या जवळ जाऊन हूल द्यायची. खाली वर, डावीकडे ऊजवीकडे, तिरका वर इ कसरती एक्स्पर्टली करायचो आम्ही. दूसरा पतंग काटायचा हे एकच ध्येय असायचे. काटायच्या दोन पध्दती होत्या, म्हणजे खालून वर वा वरून खाली. हा फारच स्किलचा खेळ होता. दूसऱ्याचा पतंग काटला की तो पकडायला धावाधाव व्हायची. ज्याचा पहिला हात लागेल त्याचा तो काटलेला पतंग. बऱ्याचदा हमरातुमरी व्हायची. मग काही वेळा मांडवली करायचो, म्हणजे पतंग एकाचा व त्याला लटकलेला मांजा दूसऱ्याचा. केव्हढा तो आनंद! पकडलेला मांजा आपल्या मांज्याला जोडायचा. पकडलेल्या पतंगाला आपला मांजा लावून बदवायचा.
व्हाँट अ टीम गेम. आलटून पालटून फिरकीपण पकडायची. लहान भावंडांना वा इतर लहानग्यांना आकाशातल्या पतंगांचा कंट्रोल द्यायचा, पब्लिक खूश. कित्ती तास आयुष्याचे पतंग उडवण्यात गेलेत ना?!
क्वचित आमच्या रामकूंज च्या गच्चीवर जायची परवानगी मिळायची, मग काय, उंच, उंच...
----
मिलिंद काळे, 13th January 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment