Er Rational musings #307
छत्तीस वर्षे, एकच जागा, एकच माणूस..
अरे दचकू नका. हे वर्णन आहे माझं व मामलेदार मिसळीचं!
दोन तिख्खट मिसळी, पाच (!) पाव व एक तिखट रस्सा. वर्षानूवर्ष, अव्याहत.
घटनाक्रम/खायची पध्दत (recommended)
~ आत जायचे. शक्यतो आपल्या उजव्या हाताला भिंत किंवा aisle येईल असे बसायचे. (म्हणजे खाताना हात दूसऱ्याला लागत नाही, मोकळा राहतो, आखडून खावं लागत नाही). आर्डर द्यायची एक तिखट. मोबाईल बंद करायचा (चे). खाताना डिस्टर्बंस नको, आणि काही जगबूडी होत नाही! फूल्ल बाह्यांचा शर्ट असेल तर दंडापर्यंत दूमडायचा, उजव्या हाताचा. रूमाल काढायचा व व्यवस्थित मांडीवर पसरायचा. नाऊ यू आर रेडी फाँर द मिसळ.
आता मिसळ येईल. त्या बशीत दोन चमच्यांन्नी मिसळ नीट कालवायची. सावकाश, हे स्किल आहे, न सांडता. खाली एक छोटासा साधारण चौकोनी आकाराचा बटाटा असतो. तो एका चमच्यात घेऊन दूसऱ्या चमच्याने स्किलफूली त्याचे लहान तूकडे करायचे व छान मिक्स करायचे. आता डाव्या हातात पाव पकडून, लचके घेत घेत, एक तूकडा पावाचा व एक चमचा मिसळीचा, असं चूपचाप, न बोलता फस्त करायचे. (खाताना, माझ्यासारखी तूम्ही पण दाद देवू शकता. एखाद्या सूरेल गायनाला रसिक श्रोते जशी दाद देतात, तसेच माझे चालू असते - हातवारे.) एक मिसळ संपल्यावर दूसरी मागवायची. दूसरी मिड वे खाऊन संपली की एक तिख्खट रस्सा मागवून ओतायचा. ह्यावेळी मिसळी बरोबरचे दोन पाव संपवून एक (पाचवा) पाव एक्स्ट्रा मागवायचा. आता मात्र पाव उजव्या हातात घेवून तूकडे मिसळीत बूचकळून तिखटजार मिश्रणात लडबडून चाटून पुसून मिसळ स्वच्छ करायची!
पहिली मिसळ संपल्यावर एक व दूसरी संपल्यावर अजून एक ग्लास असे पाणी प्यायचे. बिल सांगायचे. शर्ट फोल्ड केलेला सरळ करायचा. बिल पे करायचे. बाहेर यायचे. वाँश बेसीन बाहेर आहे, तिथे तोंड धुवायचे. मोबाईल चालू करायचा (चे) व मार्गस्थ व्हायचे. माझ्यासारखे तोंडातल्या तोंडात पुटपुटत, शिव्या देत, छ्या म्हणत, श्शी म्हणत वगैरे वगैरे (माझी कौतूक करण्याची पध्दत आहे हो!).
पूढे परत यायचा वायदा करत.
काय चव आहे. अख्या जगातली सर्वश्रेष्ठ मिसळ! Impossible, श्शी, च्या** घो, आय**ली, छ्या...
---
मिलिंद काळे, 2nd January 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment